भारतातील हजारो वर्षांपूर्वीची प्रसिद्ध प्राचीन मंदिरे - © सुयोग शहा
भारतातील हजारो वर्षांपूर्वीची प्रसिद्ध प्राचीन मंदिरे © सुयोग शहा
हिंदू धर्मात ३३ कोटी देवदेवता आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्यातील गावात सुद्धा किमान दोन तीन देवळे आढळतात. देवदेवतांची मंदिरे उभारण्याची परंपरा फार प्राचीन आहे आणि त्याकाळी कोणत्याही सुविधा आणि आधुनिक हत्यारे नसतानाही अत्यंत भव्य अशी मंदिरे येथे बांधली गेली. त्यांचा इतिहास अगदी पाच हजार वर्षांपूर्वीपासूनही सापडतो. कांही मंदिरे महाभारत, रामायण कालीन असल्याचेही सांगितले जाते. भारतातील अशाच हजारो वर्षे जुन्या प्राचीन आणि जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मंदिरांची ही संग्रहित फोटोंच्या रूपाने माहिती.
अवघा भारत देश हा मंदिरस्थापत्याने श्रीमंत आहे. कुठल्याही राज्यात जावे तिथे एखादे तरी देखणे, सुंदर मंदिर आपले स्वागत नक्कीच करेल. प्राचीन भारतात मंदिरस्थापत्य बहराला आलेले होते. प्रत्येक शिल्पसमृद्ध मंदिर उभारणीमागे अनेक कलाकारांनी आपले प्राण ओतलेले आहेत. त्या कलाकारांच्या पाठीशी बलाढय़ राजसत्ता उभ्या होत्या, त्यामुळेच हे देखणे वैभव आजही आपल्यासमोर मोठय़ा दिमाखात उभे आहे. मंदिरामागे दडलेले रहस्य, त्यावर केलेले शास्त्रीय प्रयोग, त्यावरील विविध मूर्ती आणि शिलालेख आणि त्यातून उलगडणारे इतिहासाचे पदर हे सगळे जाणून घेण्यासाठी अभ्यासक असायची गरज नाही. फक्त चौकस दृष्टी आणि फिरायची आवड असायला हवी. असे जमले की हा अवघा देश फिरून संपणार नाही इतका खजिना आपल्या इथे वसलेला आहे. एवढय़ा सगळ्या संपत्तीमधून निवडक हिरे उचलून काढणे अतिशय अवघड आहे. परंतु त्यातही आपल्या शैलीमुळे, त्यावरील शिल्पांमुळे, काही खास वैज्ञानिक प्रयोगांमुळे जी मंदिरे आयुष्यात एकदा तरी न चुकता पाहायला हवीत अशा मंदिरांची मांडणी चौकस लोकांसमोर मांडायचा हा माझा निर्मळ प्रयत्न आहे.
मंदिर स्थापत्याचा दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील प्रवास बघायचा असेल तर भारतातील प्राचीन काळातील मंदिरांचा आढावा घेणे गरजेचे आहे. भारतात इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून दगडात कोरलेल्या प्राचीन लेणी आढळतात. परंतु भारतातील मंदिर स्थापत्याचा विचार करताना अनेकदा प्रसिद्ध गुप्त घराण्यातील राजांच्या काळात म्हणजे इसवी सन चौथ्या, पाचव्या शतकात (सुमारे १५०० वर्षांपूर्वी) निर्माण झालेल्या मंदिरांपासून सुरुवात केली जाते. कारण या काळातील दगड आणि विटांनी बांधलेली मंदिरे अजूनही देवगड, सांची, भितरगाव इत्यादी ठिकाणी उभी असलेली आढळतात. परंतु गुप्त घराण्यातील राजांपूर्वीच्या काळातील शिलालेखांतून, शिल्पांतून, साहित्यातील उल्लेखांतून आणि भारतातील काही उत्खननांत सापडलेल्या पुरातत्त्वीय पुराव्यांवरून इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासूनचे (सुमारे बावीसशे वर्षांपूर्वीचे) मंदिरांचे अस्तित्व, त्यांचा आकार (प्लॅन) लक्षात येतो.
भारतीय स्थापत्यातील एक महत्त्वाचा स्थापत्य प्रकार म्हणजे मंदिर स्थापत्य. भारतात जरी गुप्तकाळामधील म्हणजे इ. स. चौथ्या, पाचव्या शतकापासून मंदिरांचे अवशेष आढळत असले तरी त्याआधीच्या काळातही मंदिर निर्मिती होत होती हे उत्खननात सापडलेल्या काही अवशेषांवरून लक्षात येते, तर गुप्तकालापूर्वीच्या काही शिलालेखांतून मंदिर निर्मितीचे उल्लेखही आढळून आले आहेत. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथातही मंदिरांचे उल्लेख आढळतात.
मंदिर पर्यटन ही आपल्या देशातली नित्याची बाब. पण ते पर्यटन केले जाते ते धार्मिक अंगाने. मंदिरांमधील शिल्पसौंदर्य, स्थापत्य या दृष्टीने पाहिलीच पाहिजेत अशी भारतातली ही महत्त्वाची मंदिरे-
भारतातील निसर्ग सौंदर्याने नटलेली काही ठिकाणं




सर्वात जास्त भूमिज शिखरांनी नटलेली मंदिरे... महाराष्ट्रात आहेत.
अजून काय हवंय.. इथे मंदिरे आहेत, लेण्या आहेत, किल्ले आहेत.. मोठमोठाले वैभवशाली वाडे आहेत.. संग्रहालय आहेत…
प्राचीन भारतीय मंदिरशास्त्र, स्थापत्यशास्त्र, भूगर्भशास्त्र, अभियांत्रिकीशास्त्र, आणि ह्या सर्वांच्या जोडीला,भारतीयांची सौंदर्यदृष्टी बघितली, सर्व कला - शास्त्रांचा अभ्यास करून, त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती बघितल्या,अभ्यासल्या, तर आचंबित व्हायला होते ! आपण थोड्या जागरूकपणे भारतातील प्राचीन मंदिर, लेणी, कलाकृतींचे निरीक्षण केले, तर ते फक्त हातांनी घडवलेले, बांधलेले नाही, भारतीयांकडे उच्च दर्जाचे, ज्याला स्टेट ऑफ द आर्ट म्हणता येईल, असे तंत्रज्ञान आणि शास्त्र होते, असे नक्कीच लक्षात येते... मग साहजिकच मनात प्रश्न येतो, की काहीशे वर्षांपूर्वी आपल्याकडे असलेले एवढे प्रगत शास्त्रीय ज्ञान, तंत्रज्ञान,गेले कुठे?... आक्रमकांनी उध्वस्त केले ?... की भारतातली पुढारलेली संस्कृती आणि त्याची विश्वगुरू होण्याची क्षमता जगापुढे येऊ नये, म्हणून पाश्चात्यांनी चोरले, पळवले ?... कारण काही असो, आज जरी ती संस्कृती, शास्त्र आणि कला लोप पावलेली दिसत असली, तरीही आजसुद्धा ती कोणाला पुन्हा निर्माण करता येणार नाही, इतक्या विविध प्रकारची कौशल्ये प्राचीन भारतीयांकडे होती, हे कोणी अमान्य करू शकणार नाही...
© सुयोग शहा























































Comments
Post a Comment